Ad will apear here
Next
समाधी घेऊन जाई ज्ञानदेव...
ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला (शके १२९६) संजीवन समाधी घेतली. दर वर्षी या दिवशी आळंदीत विशेष सोहळा आयोजित केला जातो. त्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘समाधी घेऊन जाई ज्ञानदेव...’ या रचनेबद्दल...
.....
गुरुवार सकाळची प्रसन्न वेळ. ‘विविध भारती’च्या पुणे केंद्रावर सात वाजून ४५ मिनिटांनी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरू झाला. एक एक गीत प्रसारित होत होतं. गुरुवार असल्यामुळे श्री दत्तगुरूंचं भजन... त्यानंतर थोड्या जाहिराती, पुन्हा एकदा एक भक्तिगीत, त्यानंतर ठळक बातम्या... अशा क्रमानं कार्यक्रम सुरू होता आणि शेवटचं भक्तिगीत सुरू झालं. मंदिरातला घंटानाद आणि अतिशय व्याकूळ करणारी बासरी... बासरीमागून सुमन कल्याणपूर यांच्या गोड गळ्यातून अवतरले अशोकजी परांजपे यांचे बोल...

सोहळा अपूर्व जाहला गे माये...

काळजातून दु:खाची एक कळ उमटली, गळ्यात हुंदका दाटून आला... मन:चक्षूंपुढे उभी राहिली ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती... कमलाकर भागवत यांच्या अपूर्व संगीतरचनेनं, सुमनताईंच्या कमालीच्या भावविव्हळ स्वरांमधून आणि अशोकजी परांजपे यांच्या कवितेतून संजीवन समाधी सोहळ्याचं वर्णन याचि देही याचि डोळा मी अनुभवत होते. पुणे आकाशवाणीवर उद्घोषिका म्हणून कार्यरत असल्याने कितीतरी वेळा हे गीत प्रसारित केलं होतं; पण माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हे गीत प्रसारित होत असताना आणि मी घरी बसून ऐकताना त्या गीतातून भावसमाधी अनुभवत होते. एकेक कडवं पुढे जात होतं, नव्हे माऊलींचं समाधीस्थळाकडं प्रस्थान होत होतं. आपणही समाधी सोहळ्यास उपस्थित आहोत, असं वाटत होतं... खरं म्हणजे ही शब्दांची, स्वरांची आणि सुरांची ताकद होती. सुमनताई गात होत्या...

निवृत्तिनाथांनी चालविले हाती
पाहूनी ती मूर्ती धन्य वाटे 
आपण निर्गुण मागे परि रान
विश्वाचे कल्याण निरुपण...

अवघ्या विश्वाचं कल्याण व्हावं, असं पसायदान मागणारी ज्ञानेश्वरमाऊली निघाली होती, शांतपणे समाधिस्त होण्यासाठी... समाधी घेण्यापूर्वी माउलीनं वर्षभर तीर्थयात्रा केली होती. पंढरपूरला कार्तिकी एकादशीची यात्रा आटोपली आणि संतसज्जनांसह आळंदीला परत आले. समाधी घेण्याची तयारी सुरू झाली. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि शेवटची पायरी ‘समाधी’ असं अष्टांगयोगात मानलं जातं. असं म्हणतात, विवेकजागृतीनं ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर फलेच्छेचा त्याग करणाऱ्यालाच समाधी प्राप्त होते. ज्ञानप्राप्ती, पण ती कशी? तर विवेकजागृतीनं. किती महत्त्वपूर्ण आहे ही गोष्ट! ज्ञान मिळवण्याच्या नादात कितीतरी अविवेकी गोष्टी करणाऱ्या आजच्या संगणक युगातील ज्ञानीजनांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी असं मला क्षणभर वाटलं. गाणं सुरू होतं... संजीवन समाधी सोहळ्याचा प्रसंग गीतामधून मी अनुभवत होते. पुढचं कडवं सुरू झालं होतं...

सोपान मुक्ताई जाहली व्याकूळ
मायेचे हे बळ राया बोले
ब्रह्माशी ही गाठ अमृताचे ताट
फुटली पहाट ब्रह्मज्ञान...

निवृत्ती, ज्ञानदेन, सोपान, मुक्ताई या भावंडांबद्दल बालपणापासून ऐकलं, वाचलं होतं. पुन्हा पुन्हा त्या प्रसंगाशी मन घोटाळत राहतं. डोळ्यापुढं दिसते इवलीशी मुक्ता. ज्ञानदेवांच्या खांद्याला झोळी. त्या झोळीत काहीच पडलेलं नसतं. त्या दिवशी घरा-घरातून त्या बालजिवांची झालेली उपेक्षा, अवहेलना... ज्ञानोबाला सहन होत नाही सारं... तो झोपडीचं दार बंद करून घेतो... मनाचंही कवाड बंद करून घेतो... मुक्ताई बावरते, घाबरते. ज्ञानादादा ताटी उघडा म्हणते... रागावू नको म्हणते. ‘विश्व रागे झाले वन्ही। संत सुखे व्हावे पाणी’ असं म्हणत ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा...’ अशी आर्त हाक देते... गाणं ऐकता ऐकता सगळं सगळं आठवत राहतं. मनात विचार चमकून जातो, किती छळलं समाजानं या चिमुकल्यांना! त्यांचा दोष कोणता? दु:खाच्या, अपमानाच्या डागण्या दिलेल्या समाजाबद्दल मनात यत्किंचितही राग न ठेवता सर्वांच्या कल्याणाची त्या परमेश्वराकडे प्रार्थना करणारी, पसायदान मागणारी ज्ञानेश्वर माऊली समाधिस्त होणार होती. आळंदीत ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराजवळ समाधीची जागा निश्चित झाली. नामदेवांनी आपल्या मुलांसह समाधीची जागा स्वच्छ केली. नामदेवगाथेत वर्णन केल्याप्रमाणे बेल, तुळशी आणि निरगुडीच्या पानांचं आसन तयार केलं होतं. 

चिद्रत्न आसन उन्मनीची धुनी। 
समाधी सज्जनी पाहियेली।
धुवट वस्त्राची घडी ते अमोल। 
तुळशी आणि बेल आंथरिले।

नामदेवगाथेत माउलींच्या संजीवन समाधीचं वर्णन करणारे अभंग आहेत. ते वाचताना आपले डोळे भरून येतात. अशोकजी परांजपे यांनी लिहिलेली ही रचना ऐकताना असं वाटतं, की एकदा तरी या कवीची भेट व्हायला हवी होती. त्यांनी ही कविता लिहिताना अश्रूंना आवर कसा घातला असेल, हे विचारलं असतं.

नीर वाहे डोळा वैष्णव नाचतो
वैकुंठासी जातो ज्ञानराया
सोन्याचा पिंपळ झालासे निश्चल
सज्जनांचे बळ समाधान।

या कडव्यातील ‘निश्चल’ हा शब्द सुमनताईंनी असा काही उच्चारला आहे, की ज्ञानदेवांच्या समाधीनंतर सर्वत्र कशी नि:शब्दता, नीरवता आणि नि:स्तब्धता पसरली याचा अनुभव येतो.

गुरू देई शिष्य समाधी आपण
देवा ऐसे मन का बा केले?
पद्माचे आसन घालविले जाण
ओंकार ते पूर्ण पंचप्राण...

या कडव्यानंतर सुमनताईंचा स्वर बदलतो. संगीतरचना बदलते. सनईच्या करुण रसानं ओतप्रोत असा सूर सुमनताईंच्या स्वरांत मिसळतो. कवीचे शब्द वर्णन करण्यासाठी सज्ज होतात...

पैलतीरी हाक आली आज कानी
करूनि निर्वाणी बोलविले
ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला
कैवल्यचि झाला भक्तजन...


गाण्याच्या शेवटी समूहस्वरातला हरिओम व्याकूळ मनाला शांती देणारा... माझंही मन शांत झालं... डोळ्यांतल्या अश्रूंना तसंच वाहू दिलं... हात जोडले... डोळे मिटले... डोळ्यापुढे होती पद्मासनात बसलेली शांत मुद्रा ल्यालेली ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा! समाजकंटकांनी, दुष्टांनी केलेले अपमान, अवहेलना विसरून सर्वांच्या कल्याणासाठी पसायदान मागणारी ज्ञानेश्वर माऊली पाहता पाहता संजीवन समाधी सोहळ्यात मी ही नकळत सहभागी झाले... स्वत:ला विसरून गेले... दिवसभर माझं मन मात्र या एकाच भावव्याकुळ गीताभोवती घोटाळत राहिलं. कानात शब्दस्वरांचा अलौकिक संजीवन सोहळा सुरूच होता. नामदेवांच्या अभंगाच्या ओळी आठवत होत्या.
 
अजानवृक्षदंड आरोग्य अपार। 
समाधीसमोर स्थापियेला।
कोरड्या काष्टी फुटियेला पाला। 
तेव्हा अवधियाला नमस्कारी।।

असं म्हणतात, की ज्ञानदेवांच्या समाधीजवळ अजानवृक्षाची फांदी रोवून ठेवली होती. तिला पुन्हा पालवी फुटली. हे संजीवन समाधीचं महत्त्वाचं लक्षण मानलं गेलं. कार्तिक वद्य त्रयोदशी शके १२९६... हाच तो दिवस... सर्व संतांच्या साक्षीनं माऊलीनं संजीवन समाधी घेतली. इतक्या शतकांनंतरही माऊलींच्या प्रति असलेला भक्तिभाव आजही आपल्याला भक्तजनांच्या मनात जागृत असलेला दिसतो. अवघा आळंदीचा परिसर वैष्णवांच्या गर्दीनं फुलून आलेला दिसतो. म्हणून तर अशोकजी परांजपे यांच्या शब्दांतून अवतरलेलं संजीवन समाधी सोहळ्याचं गीतसुद्धा किती अपूर्व आहे, याची मनाला साक्ष पटते. कमलाकर भागवत यांनी स्वरबद्ध केलेली आणि सुमन कल्याणपूर यांनी गायिलेली ही कविता ज्ञानेश्वरमाऊलींसाठी वाहणारी शब्दस्वरांची इंद्रायणीच वाटते...

समाधी घेऊन जाई ज्ञानदेव 
सोहळा अपूर्व झाला गे माये...

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत.)
 





BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZSFCG
 खूप सुंदर वर्णन केलं आहे. कल्पनाही करवत नाही की किती हलकल्लोळ उडाला असेल. शेकडो लोक जमा झाले असतील अपरंपार शोक करत असतील. खुद्द निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू असतील.

ज्यांनी ज्ञानदेवांना सदेह बघितलं ते भाग्यवान !
 अप्रतिम
Similar Posts
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...
मृदुल करांनी छेडित तारा... सुमन कल्याणपूर नावाचे शांत, सोज्वळ, सुशील आणि सुमधुर स्वर आणि रमेश अणावकर नावाचे, नेमकी भावना व्यक्त करणारे नि सुरांशी जुळवून घेणारे शब्द.... अवतीभवतीचा कोलाहल विसरायला लावणारी शक्ती या शब्द-सुरांपाशी असते. सुमन कल्याणपूर यांचा ८३वा वाढदिवस २८ जानेवारीला झाला, तर आज, ३० जानेवारीला रमेश अणावकर यांचा १६वा स्मृतिदिन आहे
जोवरी हे जग, तोवरी गीतरामायण... ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात रामनवमीच्या औचित्याने गीत रामायणावरचा हा लेख....
आखाजीचा मोलाचा सन देखा जी.... आखाजी म्हणजेच अक्षय्यतृतीया! उन्हाचा कहर वाढत असतो, जिवाची लाही लाही होत असताना आखाजीच्या सणाची तयारी स्त्रिया मोठ्या उत्साहानं करतात. आखाजीचा सण खानदेशात विशेष रूपानं साजरा होतो. बहिणाबाई आपलं रोजचं जगणं आपल्या गाण्यांमधून गात असत. यशवंत देवांसारख्या श्रेष्ठतम संगीतकाराने आपल्या प्रतिभावान संगीतकलेचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language